आज सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प

0

नवी दिल्ली :

आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी 9 वाजता अर्थमंत्री सीतारमण आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जातील. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांतील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सीतारामन या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने एक लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा करतील, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर अनेक कल्याणकारी योजनांचाही या अर्थसंकल्पात सूतोवाच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या उभारणीलाही अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अर्थसंकल्प कागदविहीन म्हणजे ‘डिजिटल’ असेल. सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. सीतारामन यांची आधीची दोन अर्थसंकल्पीय भाषणे दोन तासांपेक्षा जास्त लांबली होती. 2019 मध्ये आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांनी 135 मिनिटे भाषण केले, तर 2020 मध्ये तर त्यांनी विक्रमी 162 मिनिटे भाषण केले. सीतारामन यांनी मागच्या अर्थसंकल्पातही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या; पण त्यातील अनेक घोषणा अपूर्ण राहिल्या आहेत.

अर्थमंत्री मांडणार अर्थसंकल्प

दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील. प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाला संक्षिप्त स्वरुपात अर्थसंकल्पाबाबत माहिती देतात. अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पाबाबत गोपनियता पाळली जाते. अर्थमंत्र्यांनी आपले भाषण सादर करण्यापूर्वी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत गुप्तता राखणं बंधनकारक असतं.

See also  केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा : शरद पवार

अशा पद्धतीने बजेट येणार पटलावर

*अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.15 वाजता आपल्या निवास्थानाहून रवाना होतील
*निर्मला सीतारमण आणि अर्थसंकल्प तयार करणारी टीम सकाळी 9 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतील.
*राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सकाळी 10 वाजता निर्मला सीतारमण बजट ब्रीफ केससह संसदेत दाखल होतील. *संसद भवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन होईल.
*त्यानंतर संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिकरित्या मंजुरी देण्यात येईल.
*सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल आणि अर्थमंत्री भाषण करतील
*बजेट स्पीचनंतर पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर वक्तव्य देतील.