केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा : शरद पवार

0

मुंबई –

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रकार घडला आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले होते. परवानगी दिलेला मार्ग सोडून इतर भागात घुसण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलकांनी केल्यामुळे पोलीस व आंदोलक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आंदोलकांनी पोलिसांवर हल्लाबोल करून ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला.

एकंदरीत दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. ‘अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या, असं सांगतानाच बळाचा वापर करून निर्णय घेणं योग्य नाही. तशी मानसिकताही ठेवू नका. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारने करू नये,’ असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, ‘मी यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोर्चे पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही पाहिला आहे. पण फक्त शेतकरी वर्गालाच टार्गेट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणं, त्यांना पाकिस्तानी संबोधणं, त्यांच्या झेंड्यावरून वक्तव्य करणं हा आततायीपणा आहे, असं सांगतानाच देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. दिल्लीतच शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. चर्चा करायला हरकत नव्हती,’ असंही ते म्हणाले आहेत.

See also  राहूल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र केले अभिनंदन