मुंबई :
तौत्के चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून ते गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झाले आहे.
येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उवर्रित भागातही याचा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे.
Severe weather warnings issued by IMD @RMC_Mumbai and @RMC_Nagpur
for coming 5 days in Maharashtra.
Likely formation of cyclonic strom in SE Arabian Sea on 16May,&further NNW movement,coastal & interiors of state r likely to receive heavy falls as indicated
Rains in Mumbai 17May pic.twitter.com/mv8H8XUQGq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2021
प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील एनडीआरएफची पथकं गोव्याला रवाना झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कुठे काय होणार परिणाम?
वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातही तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.