राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलाविली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

0

मुंबई :

गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने दाणादाण उडवली. यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा शरद पवार या बैठकीत घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचनेत झालेल्या बदलामुळे आघाडीतील धुसफूसीवरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बैठकीचे आयोजन केलं आहे. ६ ऑक्‍टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती पवार या बैठकीत घेणार आहेत. कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, पंचनामे झालेत का?, मदतीसंदर्भात काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्या-त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात दौरा करण्याच्या सूचना देखील पवार देण्याची शक्यता आहे.

या बैठकीला स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

See also  सरकारकडून रक्तदान करण्याच्या आव्हानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद