प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची किमया; 2 हजार 748 घरांचे मासिक वीजबिल झाले शून्यवत

0

पुणे :

घरगुती वीजग्राहकांना मासिक 360 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पुणे परिमंडलात 13.76 मेगावॅट क्षमतेचे 2 हजार 748 छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून संबंधित घरगुती वीज ग्राहकांचे मासिक वीज बिल देखील शून्यवत झाले आहे. तर आणखी 460 छतावरील सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.

घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणकडून 10 किलोवॅट पर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आणि सुमारे 25 वर्ष मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे 13 हजार 677 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

यामध्ये पुणे शहरात 1 हजार 391 पिंपरी चिंचवड शहरात 771 आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत 586 सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

See also  कोल्हापूरमधील एकाच शेतकरी कुटुंबातील सहा बहिणी राज्याच्या पोलीस खात्यात.