भारतात प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी नसल्याचा निष्कर्ष

0

नवी दिल्ली:

भारतात तसेच जगभर झालेल्या वेगवेगळ्या संशोधनाअंती प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करणे थांबवले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला अंतिम निर्णय आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वांच्या स्वरुपात लवकरच देशभरातील डॉक्टरांसाठी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.

उपचार करण्यासाठी ठोस औषधे नसल्यामुळे २०२० मध्ये कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करावे असा मतप्रवाह पुढे आला. डेंग्यू, मलेरिया या आजारांसाठी विशिष्ट अशी औषधे आणि उपचारांच्या वेगवेगळ्या पण ठोस पद्धती उपलब्ध आहेत. कोरोनाच्या बाबतीत २०२० मध्ये तशी स्थिती नव्हती. प्रत्येक डॉक्टर रुग्णाच्या तब्येतीचा आढावा घेतल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करत होते. अखेर आयसीएमआरने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं जाहीर केली. उपचारासाठी निवडक पर्याय निश्चित करण्यात आले. यात प्लाझ्मा थेरपीचा समावेश करण्यात आला. पण नव्या संशोधनानंतर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करणे थांबवले जाण्याची शक्यता आहे.

आधी ठराविक लक्षणे आढळली तर संबंधित कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यास परवानगी होती. यात काही दिवसांपूर्वी कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीचे थोडे रक्त घेतले जायचे. प्रयोगशाळेत या रक्तातून प्लाझ्मा नावाचा घटक वेगळा केला जायचा. हा घटक सलाइनच्या माध्यमातून कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडला जायचा. या पद्धतीने कोरोनामुक्त झालेल्याच्या शरीरातील अँटीबॉडी कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडून रुग्णावर उपचार करण्याचा प्रयत्न होता. पण आतापर्यंत जेवढ्या कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार झाले त्यातील किती रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे बरे झाले याचा आढावा घेतल्यावर उत्तर नकारात्मक आले. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या शून्य किंवा नगण्य अशी आहे. यामुळेच कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करणे थांबवण्याबाबत विचार सुरू आहे.

See also  सहकारी बँकेतील संचालक किमान पदवीधर असावा असा नवा नियम रिझर्व्ह बँक करण्याची शक्यता