जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने मिळविले रौप्य पदक.

0

बल्गेरिया :

बल्गेरियातील सोफिया येथे सुरू झालेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या पाच कुस्तीपटूंनी पदके आपल्या नावे केली. सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने फ्री स्टाईल १२५ किलो ग्रॅम वजनी गटात रौप्य पदक पटकावत भारतासाठी फ्रीस्टाइल प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी केली.

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर सोफिया येथे १७ ऑगस्टपासून २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारताकडून १० कुस्तीपटूंनी आव्हान सादर केले. त्यापैकी सात जणांना पदक पटकावण्यात यश आले. अभिषेक ढाका याने ५७ किलो वजने गटात, सुजित याने ६५ किलो वजनी गटात, मुलायम सिंग याने ७० किलो वजनी गटात व नीरजने ९७ किलो वजनी गटात कांस्य पदके आपल्या नावे केली. तर दीपक, जॉन्टी कुमार व आकाश यांना पदकापर्यंत पोहोचता आले नाही. बुधवारी उशिरा सागर जगलान याने ७४ किलो वजनी गटात व मोहितने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदके जिंकून भारताच्या पदकांची संख्या सातवर नेली‌.

या सात पदकांसह भारतीय संघाने फ्रीस्टाइल कुस्तीत ११२ गुणांसह सांघिक कांस्यपदक पटकावले. सुवर्ण इराणने तर रौप्य अमेरिकेने आपल्या नावे केले.

भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी महेंद्र गायकवाड याने केली. त्याने सेमी फायनल बाउटमध्ये उझबेकिस्तानच्या नामोझ याला ६-० असे पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात त्याने अमिरेझा वलाडी याच्याशी झुंज दिली. मात्र, आपल्या अनुभवाच्या जोरावर वलाडीने १३-२ अशी सरशी साधत सुवर्णपदक जिंकले. महेंद्रला मागील महिन्यात बहारीन येथे झालेल्या आशियाई अंडर २० चॅम्पियनशिपमध्ये देखील रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

महेंद्र हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. मात्र, तो मागील काही वर्षांपासून कात्रज येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो. अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्तीचे धडे गिरवतो. महेंद्र गायकवाड याने यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता.

See also  रोहित शर्माने ठोकले परदेशी भूमीवरील कसोटीमधील पहिले शतक

https://twitter.com/wrestling/status/1559946776093888513?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559946776093888513%7Ctwgr%5E1475edd4a9fe03271d66b2d545be5802fb4305a7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F