पीव्ही सिंधूने केला मलेशिया ओपन सुपर स्पर्धेच्या महिला एकेरीत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली :

पीव्ही सिंधूने मलेशिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर सायना नेहवाल आणि बी सुमीथ रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र जोडी स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत.

पीव्ही सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा २१-१३, २१-१७ असा पराभव करत पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले. तिने पोर्नपावी सोबतचा पहिला गेम २१-१३ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये पोर्नपावीने सिंधूला आव्हान दिले. पॉर्नपावी सुरुवातीला पुढे होती. त्यानंतर मात्र सिंधूने पुनरागमन करत अखेर हा गेम २१-१७ असा जिंकून सामना आपल्या नावे केला. दुसरीकडे, सायना नेहवाल पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडली. तिला अमेरिकेच्या आयरिस वांगने २१-११, २१-१७ ने जिंकून स्पर्धेतून बाद केले. मिश्र स्पर्धेतही बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

साई प्रणीत आणि समीर वर्माही झाले पराभूत
मलेशिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत आणि समीर वर्मा यांना मंगळवारी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रणीतला जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिनटिंगकडून पराभव पत्करावा लागला, तर समीरला जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून पराभव पत्करावा लागला.

See also  भारतीय पॅरालिम्पिकपटूंचा खेळ बघून मला प्रेरणा मिळते : नरेन्द्र मोदी