अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले

0

रविवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभूत करण्याचा कारनामा केला.

या पराभवामुळे जोकोविचचे कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे त्याबद्दल बरीच चर्चा झाली. पण, याबरोबरच या सामन्यानंतर सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मेदवेदेवने केलेले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन.

मेदवेदेवचे ‘डेड फिश’ सेलिब्रेशन
अंतिम सामन्यात जोकोविचविरुद्ध विजयी पाँइंट मिळवताच मेदवेदेव कोर्टवरच झोपला आणि त्याने मरणाचा अभिनय करताना डोळे बंद करुन जीभ बाहेर काढली होती. अशा प्रकारचे सेलिब्रेशन टेनिस चाहत्यांसाठी नवीन आहे. यापूर्वी असे कोणी केलेले नव्हते. त्यामुळे सर्वांनाच त्याच्या या सेलिब्रेशनचे आश्चर्य वाटले.

सेलिब्रेशनमागील कहाणी
दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने नंतर त्याच्या या सेलिब्रेशनबाबत खुलासा केला. अशा प्रकारचे सेलिब्रेशन ‘फिफा’ या प्लेस्टेशन गेममध्ये केले जात असल्याचे त्याने सांगितले.

ट्रॉफी वितरण सोहळ्यावेळी तो त्याच्या सेलिब्रेशनबाबत म्हटला, ‘केवळ दिग्गजच हे समजू शकतात. माझे सेलिब्रेशन L2 + Left होते.’ फिफा व्हिडिओ गेम खेळताना खेळाडूने गोल केल्यानंतर ‘डेड फिश’ सेलिब्रेशन करण्यासाठी ही बटणं दाबली जातात. मेदवेदेव फिफा व्हिडिओ गेमचा मोठा चाहता आहे.

त्याने पत्रकार परिषदेत असे सेलिब्रेशन करण्यामागील कारण सांगितले. तो म्हणाला, यावर्षी विम्बल्डन सुरु असताना तो एका रात्री झोपू शकला नव्हता. तो हाच विचार करत होता की जर जिंकला तर तो कसे सेलिब्रेशन करेल. त्याला नेहमीप्रमाणे सेलिब्रेशन करायचे नव्हते.

तो पुढे म्हणाला, ‘मला फिफा खेळायला आवडते. मला प्लेस्टेशनवर खेळायला आवडते. त्याला ‘डेड फिश’ सेलिब्रेशन म्हणतात. जर फिफामध्ये तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी माहित असेल, तर तुम्ही अनेकदा असे करता. तुम्ही गोल करता, ५-० ने लीड घेता आणि मग तुम्ही हे सेलिब्रेशन करता.’

रशियाचा २५ वर्षीय मेदवेदेव म्हणाला की त्याने लॉकर रूममधील लोकांशी गप्पा मारल्या आणि त्याने अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळाल्याने ‘डेड फिश’ सेलिब्रेशन करण्याबद्दल त्यांची मतं जाणून घेतली होती.

See also  ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी साठी 'शरद शतम्' आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी समिती गठित : धनंजय मुंडे

मेदवेदेव पुढे म्हणाला, ‘मी हे वृत्तपत्रांमध्ये झळकण्यासाठी केलेले नाही. मला त्याबद्दल काळजी नाही. पण मला हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी, माझ्या मित्रांसाठी, जे माझ्याबरोबर फिफा खेळतात, त्यांच्यासाठी खास करायचे होते. ते मी माझ्यासाठी विशेष बनवले, त्याबद्दल मी आनंदी आहे.’

मेदवेदेव पुरुष एकेरीमध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा ९० च्या दशकात जन्मलेला दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी डॉमनिक थीमने गेल्यावर्षी अमेरिकन ओपन जिंकले होते, तेव्हा तो ग्रँडस्लॅम जिंकणारा ९० च्या दशकात जन्मलेला पहिला खेळाडू ठरला होता.