५ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार : राज्य निवडणुक आयोगाची घोषणा

0

मुंबई :

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. 5 ऑक्टोबरला मतदान तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.

मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका नको अशी भूमिका विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली आहे. मात्र, आता निवडणुका घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको अशी भूमिका घेतली आहे. अशावेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांशी बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील, असं काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण टिकवण्यासाठी काही उपाय सुचवले होते. त्याची अंमलबजावणी तातडीने केली गेली असती तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.

“फक्त बैठकांचं सत्र सुरु, निर्णय मात्र नाही”

भाजपने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याबाबत सरकारमधील मंत्रीही मान्य करतील. पण सध्या सत्ताधाऱ्यांकडून फक्त बैठकांचं सत्र सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दिवसभर बैठका झाल्या की संध्याकाळी एका निर्णयापर्यंत सरकार पोहोचायचं. पण इथे बैठकांची मालिका सुरु आहे, निर्णय मात्र होत नाही, अशी खंतही दरेकर यांनी व्यक्त केलीय.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

See also  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल

किती जागांसाठी निवडणूक

जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगा