भारताची स्टार तिंरदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषक २०२१ मध्ये मिळवले तिन सुवर्ण

0

पॅरिसमध्ये सध्या तिरंदाजी विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताची स्टार तिंरदाज दीपिका कुमारीने शानदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवले आहे. तिने रविवारी (२७ जून) विविध गटात खेळताना ३ सुवर्णपदकांची कमाई करत देशाला मोठे यश मिळवून दिले आहे. या स्पर्धेत भारताने आता एकूण ४ सुवर्णपदकं जिंकली आहेत. शनिवारी अभिषेक वर्माने कम्पाउंडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले होते.

दीपिकाची एकाच दिवसात ३ सुवर्णपदकांची कमाई
दीपाकाने रविवारी रुसच्या एलिना ओसिपोवाला महिला वैयक्तिक रिकर्व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ६-० अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. याबरोबरच तिने एकाच दिवसात सुवर्णपदक जिंकण्याची हॅट्रिक केली.

ही स्पर्धा जुलै महिन्यात होणाऱ्या ऑलिंपिकपूर्वी होत असल्याने त्यादृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. दीपाकाने रविवारी मिश्र संघ आणि महिला रिकर्व संघाकडूनही सुवर्णपदक जिंकले.

पती अतनु दासह जिंकले सुवर्णपदक
मिश्र संघाच्या अंतिम फेरीत दीपिकाने पती अतनु दाससह नेदरलँड्सच्या जेफ वॅन डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर यांच्या विरुद्ध ०-२ अशा पिछाडीनंतरही पुनरागमन करत ५-३ असा विजय मिळवला. या विजयाबद्दल अतनु दास म्हणाला, ‘हा एक शानदार अनुभव होता. आम्ही पहिल्यांदा एकत्र अंतिम फेरी खेळत होतो आणि आम्ही एकत्र विजय मिळवला. खूप आनंद होत आहे.’

दीपिका आणि अतनु यांचे मागीलवर्षी ३० जूनला लग्न झाले आहे.

भारतील महिला रिकर्व संघासह सुवर्णपदक
दीपिकाने रविवारी पहिले सुवर्णपदक महिला संघासह जिंकले. मागील आठवड्यात टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळवण्यास महिला रिकर्व संघाला अपयश आले होते. पण विश्वचषकात महिला संघाने सुवर्णपदकाची कमाई करत या निराशेवर मात केली. दीपिकासह अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश असणाऱ्या भारतीय महिला रिकर्व संघाने अंतिम फेरीत मेक्सिकोला ५-१ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदत जिंकले.

See also  दिल्ली कॅपिटल ची चेन्नई सूपर किंग्स वर दणदणीत मात

विश्वचषकाच्या पहिल्या स्टेजच्या अंतिम फेरीतही भारतीय महिला रिकर्व संघाने मेक्सिकोला हरवून पहिला क्रमांक मिळवला होता. तिसऱ्या स्टेजमध्येही भारतीय महिलांनी कमाल करत अंतिम फेरीत मेक्सिकोलाच पराभूत करत सुर्णपदक जिंकले. यावर्षी विश्वचषकात त्यांचे सगल दुसरे आणि एकूण सहावे सुवर्णपदक आहे. यापूर्वी शंघाय २०११, मेडेलिन २०१३, रोक्लॉ २०१३, रोक्लॉ २०१४, ग्वाटेमाला सिटी २०२१ या स्पर्धेत ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी संघात दीपिकाचा सहभाग होता.