उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी आयटीआय ची इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली !

0

नवी दिल्ली :

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीची घटना घडली आहे. ढगफुटीमुळे पुन्हा एकदा मोठा विध्वंस पाहायला मिळाला. ही घटना देवप्रयागची आहे. येथे ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला. आयटीआयची अख्खी इमारतच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. या भागातील अनेक दुकानेही भुईसपाट झाली आहेत. साहजिकच ढगफुटीवेळी मुसळधार पाऊस पडल्याने नुकसान आणखी जास्त आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

3 मे रोजीही झाली होती ढगफुटी

यापूर्वी 3 मे रोजी उत्तराखंडमधील टिहरी, उत्तरकाशी आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांत ढगफुटीच्या बातम्या आल्या. रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीच्या वृत्ताची त्वरित दखल घेत त्यांनी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून फोनवर माहिती घेतली आणि पीडितांना तातडीने मदत पोहोचवण्याचे तसेच बचाव कार्याचे निर्देश दिले.

देवप्रयागचे अधिकारी एम रावत यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजता ढगफुटी झाली. यावेळी 12 ते 13 दुकाने आणि इतरही अनेक मालमत्तांचे नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे बहुतांश दुकाने बंदहोती, यामुळे अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. येथे पाण्याची पातळी वाढलेली आहे, यादरम्यान बचावकार्यही सुरू आहे.

दोन्ही जिल्हाधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएच आणि बीआरओ यांना आदेश देण्यात आले आहेत की जे मार्ग बंद झाले आहेत ते त्वरित उघडण्यात यावेत, जेणेकरून जनतेला कोणतीही अडचण येणार नाही.

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्याशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्री शहा यांनी रावत यांना राज्यातील ढगफुटीच्या घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली तसेच केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

उत्तराखंडमध्ये 18 मेपर्यंत कर्फ्यू

See also  कृषी कायदे मागे घेत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार : राकेश टिकैत

उत्तराखंडमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. 11 मे रोजी सकाळी 6 ते 18 मे या कालावधीत संपूर्ण उत्तराखंडमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यावेळी फळ-भाजीपाला, दूध व किराणा दुकान सकाळी 7 ते 10 या वेळेत खुले असतील. शॉपिंग मॉल्स तसेच मद्याची दुकाने बंद असतील.