गोव्याच्या सरकारी रुग्णालयांमध्ये 2६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी हायकोर्टाने तपास करावा : आरोग्यमंत्री राणे

0

पणजी :

गोव्याचे सरकारी रुग्णालय असलेल्या GMCH मध्ये मंगळवारी २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यावरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील तणाव वाढला आहे. या प्रकरणात रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी हायकोर्टाने तपास करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राणे यांनी केली आहे, या रुग्णांचा मृत्यू मध्यरात्री २ ते पहाटे ६ या काळात झाला, मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचेही राणे यांनी सांगितले होते.

तर, दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली, तेव्हा सांगितले की राज्यात ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नाही. रुग्णांच्या वॉर्डापर्यंत बाहेरुन होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या अंतरामुळे रुग्णांना त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या दौऱ्यानंतर, मृत्युच्या कारणांचा योग्य शोध लागण्यासाठी, आरोग्यमंत्री राणे यांनी या प्रकरणाचा तपास हायकोर्टाने करावा, अशी मागणी केली आहे. हायकोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करत, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश द्यावेत, त्यामुळे असे प्रकार यापुढे रोखले जातील, असे राणे यांचे म्हणणे आहे.

या रुग्णालयात सोमवारी १२०० मोठ्या सिलिंडरची गरज होती, प्रत्यक्षात मात्र ४०० सिलिंडरच रुग्णालयाला देण्यात आले. जर वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा कमी होते असेल तर त्याबाबत चर्चा होण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले. या सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारावर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३ सदस्यीय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना योग्य माहिती द्यायला हवी होती.

त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यावेळी, ऑक्सिजन वॉर्डपर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या, त्या आता दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज मुख्यमंत्री सावंत यांनीव्यक्त केली होती. राज्यात योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा साठा असून, त्याची राज्यात कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक रुग्णालयात योग्य ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी वॉर्डवार योजना करण्याची घोषणा त्यांनी यापूर्वी केली होती. एकूणच आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या विधानांनी संभ्रम मात्र निर्माण झाला आहे.

See also  विजसंकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा मदतीचा आधार