आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ गिरिप्रेमीकडून उत्साहात साजरा

0

पुणे शहर : प्रतिनिधी :-

पुण्यातील फर्ग्युसन टेकडी येथे पर्वत पूजन करून पर्वतांप्रती ऋण व्यक्त करत गिरिप्रेमी संस्थेकडून ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल पाटील (उपवनसंरक्षक, पुणे), डॉ. संजीव नलावडे (पर्यावरणतज्ज्ञ), राजीव पंडित (संचालक, जीविधा), अनुज खरे (सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार समिती), प्र.के. घाणेकर (प्रसिद्ध लेखक), उषःप्रभा पागे (संस्थापिका- अध्यक्षा, गिरिप्रेमी), उमेश झिरपे (जेष्ठ गिर्यारोहक व अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ) इत्यादी उपस्थित होते. 2003 पासून संयुक्त राष्ट्रसंघमार्फत 11 डिसेंबर हा दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी एक विशिष्ट विषय घेऊन हा दिवस साजरा होतो. यावर्षी पर्वत व तेथील जैवविविधता हा विषय नेमण्यात आला होता. त्यालाच अनुसरून विविध कार्यक्रम गिरिप्रेमी संस्थेने आयोजित केले होते.

पाटील म्हणाले, “पर्वतांचा, वनांचा घनिष्ट संबंध आहे. पर्वतांचे पूजन, पर्वतांचे रक्षण म्हणजेच एका अर्थाने वनांचे देखील रक्षण व पूजन आहे, असे मी मानतो. पर्वतांवर प्रेम करणारी लोक वन संवर्धन कामामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात. या पर्वत दिनाच्या निमित्ताने पर्वतप्रेमींना वन संवर्धन कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.”

डॉ. नलावडे म्हणाले, “जैवविविधता ही मोठ्या प्रमाणावर पर्वतीय प्रदेशातच आढळते. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या 32 जैवविविध प्रदेशांपैकी अर्ध्याहून अधिक प्रदेश हे पर्वतांमध्ये आहेत. भारतातील पश्चिम घाट, ज्याचा सह्याद्री हा प्रमुख भाग आहे आणि हिमालय हे या 32 पैकी प्रमुख भाग आहेत. सह्याद्री असो वा हिमालय, येथील जैवविविधतेचे संवर्धन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा येथील पर्वतांचे रक्षण व संवर्धन होईल. त्यामुळे पर्वत आणि तेथील जैवविविधता हा विषय अत्यंत समर्पक असून दोहोंचे संवर्धन ही काळाची गरज आहे.”

यावेळी पंडित, खरे व झिरपे यांनी देखील आपले विचार मांडले. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील भूगोल विभागातील प्राध्यापक व गिर्यारोहक डॉ. अविनाश कांदेकर यांनी सह्याद्री पर्वत व येथील खडक यांविषयी रंजक माहिती सांगितली. गिरिप्रेमी सदस्य व एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांनी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’निमित्त गिरिप्रेमी आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यात पॉडकास्ट, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण प्रस्ताररोहकांनी खाणीतील कातळकड्यांवर प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमास गिरिप्रेमीचे विविध गिर्यारोहक व सदस्य उपस्थित होते. कोव्हिड-19 संक्रमण संबंधी असणारे सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या गव्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

See also  पुणे महापालिकेने घेतला ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय