राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश.

0

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. तसेच कोरोना लसीकरणाला वेग देण्याचाही प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

काही जण पात्र नसतानाही कोरोना लस घेत असल्याचे निर्दशनास आल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मात्र, असे असले तरी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु राहणार असून त्यांनी आपली नावे कोव्हिन पोर्टलच्या माध्यमातून नोंदवायची आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

अचानक २४ टक्क्यांनी वाढ

आम्ही विविध लोकांशी चर्चा केली आहे. त्यातून आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, मागील काही दिवसांत आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर्सच्या लस घेण्याच्या प्रमाणात अचानक २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही लसीकरण केंद्रांमध्ये काही जण आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर्स असल्याचे सांगत कोरोनाची लस घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नव्याने नोंदणी थांबवण्याची गरज असल्याचे राजेश भूषण पत्रात म्हणाले. देशात शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत देशात ७ कोटी ४४ लाख ४२ हजार २६७ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

See also  केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा : शरद पवार