राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्ती पैलवानानी जिंकली तीन सुवर्ण पदके…

0

बर्मिंघम :

भारताचा युवा कुस्तीपटू दीपक पुनियाने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद इनाम बट याचा ३-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

दीपकसमोर अंतिम फेरीत अनुभवी बटचे आव्हान होते. बटने यापूर्वी देखील राष्ट्रकुल पदक जिंकले होते. या अंतिम सामन्यात त्याचे पारडे काहीसे जड मानले जात होते. मात्र, दीपकने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. त्यामुळे बटला बचावात्मक धोरण स्वीकारावे लागले. याचाच फायदा घेत दीपकने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची शानदार कामगिरी करून दाखवली. पॅसिविटीचा फायदा घेत दीपक पहिल्या फेरीअखेरीस २-० अशा आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही दोन्ही खेळाडूंनी बचावात्मक खेळ केल्याने दीपक केवळ एक गुण घेऊ शकला. मात्र, त्याचा हा एक गुण सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुरेसा होता.

दीपकने मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारलेली. मात्र, अगदी थोडक्यात तो पदक जिंकण्यापासून वंचित राहिलेला. त्यावेळी आलेले अपयश त्याने यावेळी भरून काढत पदक आपल्या नावे केले.

दीपकआधी भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते दोन कुस्तीपटू म्हणजे पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया व महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी देखील सुवर्णपदक जिंकले. अवघ्या एका तासाच्या अवधीत भारताला ही तीन सुवर्णपदके मिळाली. याव्यतिरिक्त भारताची आणखी एक महिला कुस्तीपटू अंशू मलिकने रौप्य पदक तर दिव्या कांकरानने कांस्यपदक आपल्या नावे केले. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता ८ झाली. यातील सर्वाधिक तीन सुवर्णपदके ही एकाच दिवशी आणि एकाच खेळात भारतीय संघाने मिळवून कुस्तीत आपला अजूनही दबदबा असल्याचे दाखवून दिले.

See also  अंतर्गत भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त : संदिप भोंडवे