राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात २१५ खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेणार सहभाग.

0

बर्मिंघम :

बर्मिंघम येथे २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचे २१५ खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवतील.

या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी १०० हून अधिक कोचिंग स्टाफ आणि अधिकारी बर्मिंघम येथे जातील. शनिवारी (१६ जुलै) स्पर्धा सुरू होण्याच्या १२ दिवस आधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने संपूर्ण ३२२ सदस्यीय दलाची औपचारिक घोषणा केली. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता याप्रसंगी म्हणाले, “आम्ही आमचा सर्वात मजबूत संघ पाठवत आहोत. आपण नेमबाजीत खूप मजबूत आहोत. मात्र, यावेळी नेमबाजी राष्ट्रकुल स्पर्धेचा भाग नाही. असे असूनही, मागील स्पर्धेपेक्षा यंदा चांगली कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे.”

पंधरा खेळांमध्ये होणार सहभागी

भारतीय खेळाडू १५ खेळांमध्ये आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये भाग घेतील. बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टिंग, महिला क्रिकेट आणि कुस्ती यांसारख्या पारंपारिकदृष्ट्या मजबूत खेळांमध्ये संघाने चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. महिला क्रिकेट प्रथमच या खेळांचा भाग बनला आहे. काही भारतीय खेळाडू आधीच बर्मिंघमला पोहोचले आहेत. उर्वरित खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर थेट तिथे पोहोचतील. कॉमनवेल्थ स्पोर्ट्स व्हिलेज २३ जुलै रोजी अधिकृतपणे खुले होईल. भारतीय संघ पाच वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहे.

या खेळाडूंकडून अपेक्षा

राष्ट्रकुलसाठीच्या भारतीय पथकातील मोठ्या नावांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचा समावेश आहे. याशिवाय टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकलेले पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया हे देखील भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. याशिवाय सध्याची राष्ट्रकुल विजेती मनिका बत्रा, विनेश फोगट तसेच हिमा दास आणि अमित पंघल हे देखील पथकाचा भाग आहेत.

https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1548306239993438211?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1548306239993438211%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील नेमबाजांना सरावासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ