विम्बल्डनचा अंतिम सामना जोकोविच विरुद्ध किर्गियोस यांच्यात रंगणार.

0

विम्बल्डन :

सध्या सुरू असलेली विम्बल्डन स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. यामध्ये शुक्रवारी (८ जुलै) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ब्रिटीश टेनिसपटू कॅमेरून नोरी याला २-६, ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात नोरीने नोवाकला सुरूवातीला चांगली झुंज दिली. त्याने पहिला सेट ६-२ असा जिंकत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. नंतर मात्र त्याला कामगिरीमध्ये सातत्य राखता न आल्याने सलग तीन सेट गमावत त्याने सामनाही गमावला आहे.

नोरी आणि जोकोविच हे दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये जोकोविचच सरस ठरला आहे. त्याने २०२१च्या एटीपी अंतिम फेरीत नोरीला पराभूत केले होते. जोकोविचचा हा ८५वा विम्बल्डन विजय आहे. त्याने विम्बल्डनचे सर्वाधिक सामने जिंकण्याच्या दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू हा विक्रम आपल्या नावे केला आहे. यावेळी त्याने जिमी कोनोर्सला मागे सोडले आहे. त्यांनी विम्बल्डनमध्ये ८४ सामने जिंकले होते. यामध्ये स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर अव्वल क्रमांकावर आहे. त्याने १०५ सामने जिंकले आहेत.

जोकोविच आठव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीत ३२व्यांदा ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामुळे तो ग्रॅंड स्लॅमचे सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा टेनिसपटू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने फेडररला मागे टाकले आहे. फेडरर ३१ वेळा ग्रॅंड स्लॅमचे सर्वाधिक अंतिम सामने खेळला आहे.

जोकोविचने विम्बल्डनचे सात अंतिम सामने खेळले आहेत. त्यातील सहा सामने तो जिंकला असून एका सामन्यात त्याला पराभूत व्हावे लागले. जोकोविच आणि फेडरर नंतर नदालने ग्रॅंड स्लॅमचे सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत.

उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचने दोन सेट मागे असताना मुंसडी मारत सामना आपल्या नावे केला होता. त्याने इटलीच्या यानिक सिनर (Jannik Sinner) याला पाच सेटमध्ये ५-७, २-६, ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्याने अनुभव पणाला लावत चांगला खेळ केला आहे.

See also  भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसने उपांत्य फेरी न खेळता अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. त्याचा उपांत्य फेरीचा सामना राफेल नदालशी होणार होता. मात्र नदालने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. निकचा ग्रॅंड स्लॅमचा हा पहिलाच अंतिम सामना असणार आहे.

जोकोविच विरुद्ध किर्गियोस हा सामान रविवारी (१० जुलै) खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात जिंकून जोकोविचला कारकिर्दीचे २१वे ग्रॅंड स्लॅम जिंकण्याची संधी आहे. त्याने एका पाठोपाठ असे तीन विम्बल्डन जिंकले आहेत. त्याने ही कामगिरी २०१८, २०१९ आणि २०२१मध्ये केली आहे. सर्वाधिक विम्बल्डन जिंकल्याचा पराक्रम फेडररच्या नावावर आहे. त्याने आठ वेळा विम्बल्डनचा चषक जिंकला आहे. त्यानंतर पीट सॅम्प्रस आणि विलियम रेनशॉ यांची बरोबरी करण्याची संधीही त्याच्याकडे आहे. हे दोघेही सात वेळा विम्बल्डनचे चॅम्पियन ठरले आहेत

https://twitter.com/Wimbledon/status/1545452914197635073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1545452914197635073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F