राजकारणाचा उलटफेर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार !

0

मुंबई :

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. इतकंच नाही तर आपण सत्तेबाहेर राहून हे सरकार व्यवस्थित चालेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतील, अशी माहिती नड्डा यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा फोन करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता राजभवनामध्ये आणखी एक खुर्ची वाढवण्यात आली असून उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस देखील शपथ घेण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजभवनातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली.

तसेच आपण मंत्रिमंडळात राहणार नाही. आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला पाठिंबा देवू, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपचे आमदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र यांना सरकारमध्ये आलं पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमने देवेंद्र यांनादेखील आग्रह केला आहे. केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा, असा आदेश दिला आहे”, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली.

See also  मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग