आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताला ५ सुवर्ण.

0

पुणे :

किर्गिझस्तानात बिशकेक येथे सुरु असलेल्या १७ आणि २३ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारतीय मुलींनी पाच सुवर्णपदकांची कमाई केली.

भारतीय मुलींच्या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे आज झालेल्या १७ वर्षांखालील गटाच्या पाचही वजन गटात त्यांनी पदक मिळविले. त्यातही चार वजन गटात त्यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुस्कान, श्रुती, रिना, सविता या चौघी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. ग्रिको रोमनगटाही ४८ किलो वजनी गटात रोहित शर्माने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

स्पर्धेतील ४० किलो वजन गटात भारताच्या मुस्कानने विजेतेपद मिळविताना जपानच्या मोना इझाका हिला चितपट केले.

त्यानंतर ४६ किलो गटात भारताच्या श्रुतीने मंगोलियाच्या नोमिन चिंझोरिग हिचे आव्हान गुणांवर ५-४ असे परतवून लावले. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत सुरवातीच्या मिनिटातच नोमिनहिने सुरेख थ्रो करत थेट चार गुणांची कमाई केली. त्यानंतर श्रुतीने पहिल्या फेरीच्या अखेरच्या टप्प्यात ताबा मिळवताना दोन गुणांची कमाई केली. मात्र, ती पहिल्या फेरीत पिछाडीवरच राहिली. दुसऱ्या फेरीत मात्र श्रुतीने नोमिनला संधीच दिली नाही. तिने आपल्या पायाची अचूक हालचाल करताना बचाव भक्कम राखला आणि प्रथम ताबा मिळवत आणि नंतर मॅटच्या बाहेर ढकलत असे एकूण तीन गुण मिळविले. नोमिनला दुसऱ्या फेरीत काहीच करता आले नाही. श्रुतीने ५-४ असा गुणफरकावर सुवर्णपदक मिळविले.

भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून देताना रिनाने ५३ किलो वजन गटात मंगोलियाच्या खालीउन ब्याम्बासुरेन हिचा गुणांवर १०-६ असा पराभव केला. त्यानंतर सविताने भारताला ६१ किलो वजन गटात चौथे सुवर्णपदक मिळवून दिले. कमालीची आक्रमक कुस्ती खेळताना तिने उझबेकिस्तानच्या उमेकेन ईसेनबाएवा हिचा ८-४ असा पराभव केला. लढतीच्या पहिल्या फेरीच्या दहाव्या सेकंदालाचत सविताने उमेकेन हिची पकड करण्याची संधी मिळाल्यावर ती सोडली नाही आणि जबरद्सत थ्रो करत तिने थेट चार गुणांची कमाई केली. त्यानंतर तिने आणखी दोन गुणांची कमाई करताना विश्रांतीला ६-२ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीतही तिने सुरवातीलाच दोन गुणांची कमाई करून पकड भक्कम केली. अखेरीच्या काही सेकंदात तिला दोन गुण गमवावे लागले.

See also  विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग असणार भारतीयपथकाच ध्वजधारक

भारताला ग्रिको रोमन प्रकारातही ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळाले. रोहित शर्मा या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. पहिली फेरीत ०-५ अशी गमावणाऱ्या रोहितने लय गवसल्यावर दुसऱ्या फेरीत इराणच्या अली अबदोलिश अहमदी वाफा याला असे काही कोंडीत पकडले की त्याचा बटाव साफ थिटा पडला. रोहितने दुसऱ्या फेरीत तब्बल ७ गुणांची केली आणि 7-6 असा विजय मिळविला.

या सुवर्णपदकांखेरीज मुलींच्या कुस्तीत ६९किलो वजन गटात मानसीर बधाना ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. ग्रिको रोमन प्रकारात प्रदीप सिंग (११० किलो) रौप्य, र मोहित खोकर (८०किलो) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.