भारत कोरिया लढत बरोबरीत सुटल्याने आशियाई हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरी पासुन वंचित…

0

जकार्ता :

भारताच्या युवा खेळाडूंनी वेगवान आणि आक्रमक खेळ करून जरुर प्रभाव पाडला. त्यांनी आशियाई हॉकी सुपर फोरच्या अखेरच्या लढतीत कोरियाला ४-४ असे बरोबरीत रोखले. पण, त्यांना अंतिम फेरीचा उंबरठा ओलांडता आला नाही.

या सामन्यापूर्वी झालेल्या लढतीत मलेशियाने जपानला ५-० असे हरवले. त्यांच्या निर्णायक विजयामुळे गोलसरासरीत पडलेला फरक भारतासाठी महागात पडला. मलेशियाचा विजय आणि भारत-कोरिया बरोबरीमुळे सुपर फोरच्या सर्व लढती झाल्यानंतर तीनही संघांचे समान पाच गुण झाले. त्यामुळे गोल सरासरीच्या आधारे भारताला अंतिम फेरीपासून वंचित रहावे लागले. आता उद्या त्यांची जपानशी तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल. अंतिम सामना मलेशिया-कोरिया यांच्यात होईल.

भारताकडून निलम झेस (९वे मिनिट), दिपसान तिर्की (२१वे मिनिट), महेश शेशे गौडा (२२वे मिनिट) आणि शक्तीवेल मारीस्वर्ण (३७वे मिनिट) यांनी गोल केले. कोरियासाठी जंग जोंगह्यू (१३वे मिनिट), जी वू शेऑन (१८वे मिनिट), किम जुंग हू (२८वे मिनिट) आणि जुंग मानजाए (४४वे मिनिट) यांनी गोल केले.

अंतिम लढतीसाठी महत्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सर्वोत्तम खेळ करणे अपेक्षित होते. मात्र, आठ गोल झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या मध्यरक्षकांना आलेले अपयश निर्णायक ठरले. वेगवान सुरवात करूनही भारतीय खेळाडूंना निर्णायक क्षणी त्याचा फायदा उठवता आला नाही. कोरियाच्या खेळाडूंना उशिराने लय गवसली. मात्र, ती त्यांना कायम राखली. हा फरक भारताला महागात पडला. बचावफळीच्या अपयशामुळे सामन्यातील बरोबरीचा खेळ शेवटपर्यंत संपला नाही.

यानंतरही सामना संपण्यास २७ सेकंद असताना भारताच्या कार्ती सेल्वम याला अगदी जवळून गोल करण्याची संधी होती. पण, कोरियन गोलरक्षक किम जाएह्योओन याने दुसऱ्या प्रयत्नात त्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि गतविजेत्यांचे आव्हान राखले.

See also  भारतातील अग्रगण्य व्यवसायिक टाटा समूह आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक