देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे : अजित पवार

0

पुणे :

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 27 ते 29 मे या कालावधीत आयोजित गोधन-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने, पुणे जिल्हा सहकारी बँकचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरू आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे, यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गायीचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

गोवंश जपून शेतकरी समृद्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य

आपल्या संस्कृतीत देशी गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशी गायींचे गोमूत्र, शेण, सेंद्रिय खत, तूप, दुध, खवा यांनाही वेगळे महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक आहेत, शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.

दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही तेवढेच महत्त्वाचे आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन होते, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी या केंद्राला भेट द्यावी. देशी गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाबाबत चांगल्या जाती, त्यांचे वैशिष्ट तसेच नवीन संशोधन याबाबत माहिती मिळणार आहे, शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत देशी गोवंश संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल औंध येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन