पुणे:
राज्यातील अनेक भागांत उकाडा जाणवत आहे, मागील काही दिवस तापमानाचा पारा खाली घसरला होता मात्र आता पुन्हा तापमानात वाढ होताना दिसत आहे.
राज्यातील काही भागात तर उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील काही भागात आज 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले होते. पुढील आठवडा भरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
देशभरातील उष्णतेच्या लाटेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.