जम्मू काश्‍मीर येथे मराठा रेजिमेंटने चक्क नियंत्रण रेषाजवळ उभारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती

0

जम्मू काश्मीर :

देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभारली आहे.

ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर उभारण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे. समाज माध्यमांवर या मूर्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हातात तलवार घेऊन घोड्यावर विराजमान असलेल्या शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती थेट सैन्यदलातील मावळ्यांसोबत नंगा पर्वताकडे पाहत शत्रूवर नजर ठेवत असल्याचे या मुर्तीकडे पाहून वाटते.

मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्‍ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. मच्छल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

याबाबत कर्नल पवार म्हणाले, ”मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजीi महाराजांची प्रतिकृती उभारण्याची कल्पना सुचली. यासाठी पुण्यातून मुर्ती मागविण्यात आल्या. गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान ही मुर्ती उभारण्यात आली. जवान उठल्यावर त्यांना महाराजांचे दर्शन घडावे अशाच ठिकाणी या दोन्ही प्रतिकृती उभारल्या आहेत.”

सीमालगत भागात प्रथमच उभारले स्मृतिस्थळ
मच्छल बटालियनच्या वतीने शिवरायांची एक मुर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मुर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या ‘मराठा स्मृतिस्थळ’ येथे बसविण्यात आली आहे. हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा बटालियनच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. या समृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्या वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील. सीमालगत भागात अशा प्रकारचे स्मृतिस्थळ पहिल्यांदाच तयार करण्यात आल्याचे कर्नल पवार यांनी सांगितले.

See also  चीनच्या एका निर्णयामुळे जगभरात औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता ?

”गेल्या अनेक वर्षांपासून मी मूर्ती साकारण्याचे काम करत आहे. या कलेचा वारसा वडिलांकडूनच मिळाला. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांसाठी हे कार्य करताना अत्यंत अभिमान वाटला. प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊन, पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर काही परिणाम होत नाही.
– अजिंक्य लोहगावकर, मूर्तिकार
अशी आहे महाराजांची मुर्ती
– सुमारे पाच फूट उंच
– – पुण्यातील एसएसपीएमएसच्या आवारातील मूर्तीची हुबेहुब प्रतिकृती
– फायबरमध्ये असलेल्या मूर्तीचे वजन २५ किलोग्रॅम
– – प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून राहील
– कोणत्याही ठिकाणी मूर्तीला हलविणे सहज शक्य
मराठा स्मृतीस्थळाबाबत ः
– रायगड किल्ल्याच्या प्रतिकात्मक स्वरूपात मराठा स्मृतिस्थळ
– येथील महाराजांची मूर्ती सुमारे १२ फूट उंच
– – हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्मृतिस्थळ येथे विशेष भिंत
– ३२ हुतात्मा जवानांची नावे भिंतीवर
– – नौदलाची प्रतिमा दर्शविण्यासाठी कृत्रिम बेट