गगनयान कार्यक्रमात देशाला आणखी एक मोठे यश, इस्रोने क्रायोजेनिक इंजीनची घेतली यशस्वी चाचणी

0

नवी दिल्ली :

गगनयान कार्यक्रमात देशाला आणखी एक मोठे यश मिळाले असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने क्रायोजेनिक इंजीनची Cryogenic engine बुधवारी यशस्वी चाचणी घेतली.

या इंजीनचा वापर देशाच्या पहिल्या मानवी मोहिमेसाठी वापरल्या जाणार्‍या जीएसएलव्ही रॉकेटसाठी होणार आहे. ही मोहीम 2023 मध्ये होणार आहे. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपेल्शन कॉम्प्लेक्स येथे क्रायोजेनिक इंजीनची Cryogenic engine 720 सेकंदांची पात्रता चाचणी घेण्यात आली. इंजीनच्या कामगिरीने चाचणीची उद्दिष्टे पूर्ण केली आणि चाचणीसाठी ठेवण्यात आलेले निकष या इंजीनने पूर्ण केले, अशी माहिती इस्रोने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.

मानवी अंतराळ मोहिमेत क्रायोजेनिक इंजीनचा Cryogenic engine समावेश केला जाणार असून, त्याची मजबुती आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने देशाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यानंतर क्रायोजेनिक इंजीन 1810 सेकंदांपर्यंत प्रज्वलित करण्यासाठी याच्या आणखी चार चाचण्या होणार आहेत, असे इस्रोने सांगितले. मानवी मोहिमेत क्रायोजेनिक इंजीनचा Cryogenic engine समावेश करण्यासाठी यानंतर आणखी एका इंजीनची अल्पकालावधीसाठी प्रज्वलित करण्यासाठी दोन आणि एक मोठ्या कालावधीची चाचणी होणार आहे.

अंतराळात पाठविणार ‘व्योममित्र’

2023 मध्ये होणार्‍या मानवी मोहिमेपूर्वी इस्रो ‘व्योममित्र’ या रोबोटला अंतराळात पाठविणार आहे. यासाठी दोन मोहिमा राबविल्या जाणार असून, त्यातील पहिली मोहीम या वर्षाच्या मध्यात आयोजित केली जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली.

See also  महिलांना तालिबान देत असलेल्या वागणुकीबद्दल आणि अत्याचाराबद्दल जगभर पडसाद