शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यात दीर्घ चर्चा

0

मुंबई :

राज्याचे एक-एक मंत्री वेगवेगळ्या कारणाने गोत्यात येत असून, यामुळे राज्य सरकार आणि पर्यायाने त्यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर महाराष्ट्र पोलिसांकरवी स्थिती सुधारता किंवा कुरघोडी करता येऊ शकते काण यासाठी आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवारांच्या घरी आज दिवसभर बैठकांचे सत्र चालले.

गेल्या महिन्याभरापासून क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून होत असलेली कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर होत असलेले आरोप, अँटिलिया प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा पोलिसांना मिळालेला ताबा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून होणारी चौकशी अशा विविध प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांची भूमिका कशी असावी, हे निश्चित करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे.

सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी पवारांशी अर्धा तास चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर शरद पवार यांनी थेट गृहमंत्री वळसे पाटील यांचे निवासस्थान गाठले. तिथे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. तिघांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर कोणीही अधिकृतपणे काहीही माहिती दिली नसली तरी, केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवायांना निष्प्रभ करण्यात मुंबई पोलिस कशी भूमिका बजावू शकतात, याबद्दल यात खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

See also  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसूनही जीडीपीने घेतली जोरदार भरारी