रोहित शर्मा झाला भारताचा नवा टी२० कर्णधार

0

मुंबई :

भारतीय क्रिकेट संघाला येत्या १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात टी२० आणि कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे मंगळवारी (९ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला असून भारताच्या टी२० संघासाठी नवे कर्णधार आणि उपकर्णधाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माला भारताचा नवा टी२० कर्णधार करण्यात आले असून केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना जयपूरला होणार आहे. त्यानंतर १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे रांची आणि कोलकाता येथे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे.

या टी२० मालिकेसाठी भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.

त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. यात ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान अशा खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आयपीएल २०२१ बरोबरच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना देखील प्रभावित केले आहे.

त्याचबरोबर युजवेंद्र चहलचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन झाले असून आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार संघात स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.

असा आहे न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

See also  पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मिळविले विजेतेपद