अफगाणिस्तानच्या मुजीबने स्कॉटलंडची फिरकी घेत केला विक्रम

0

दुबई :

टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीचा तिसऱ्या दिवशी एकमेव सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड हे ब गटातील संघ आमने-सामने आले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत स्कॉटलंडवर तब्बल १३० धावांनी मोठा विजय मिळवला.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर-रहमान याने पाच बळी मिळवत अनेक विक्रमांची नोंद केली.

मुजीबने घेतली स्कॉटलंडची फिरकी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी धावफलकावर १९० धावा उभ्या केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ अवघ्या ६० धावांमध्ये सर्वबाद झाला. अफगाणिस्तानसाठी मुजीब व राशिद खान यांनी अनुक्रमे पाच व चार बळी मिळवत स्कॉटलंडच्या फलंदाजी क्रमाचे कंबरडे मोडले.

मुजीबने या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना २० धावा देऊन पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह तो टी२० विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळताना पाच बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच त्याने टी२० विश्वचषकात अफगानिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. यापूर्वी, मोहम्मद नबी याने २०१६ विश्वचषकात हॉंगकॉंग विरुद्ध २० धावा देऊन ४ बळी मिळवले होते. मुजीब हा अजंता मेंडिस व रंगना हेराथ यांच्यानंतर टी२० विश्वचषकात पाच बळी मिळवणारा तिसरा फिरकीपटू ठरला.

अफगाणिस्तानचा धावांचा डोंगर
शारजा येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हजरतुल्ला झझाई व मोहमद शहजाद यांनी संघाला ५.५ षटकात ५४ धावांची सलामी दिली. झझाई याने ४४, गुरबाझ याने ४६ आणि नजीब झादरान याने ५९ धावांची खेळी करत अफगाणिस्तानला १९० पर्यंत मजल मारून दिली.

See also  पॅरालिम्पिकमध्ये भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली