चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांचा आयपीएल चषकावर कोरले नाव.

0

दुबई :

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना दसऱ्याच्या मूहुर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांचा आयपीएल चषकावर नाव कोरले.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २० षटकांत ३ बाद १९२ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिलने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही कोलकाताला चांगली सुरुवात मिळवून दिली. दरम्यान, यष्टीरक्षक एमएस धोनीकडून सुरुवातील व्यंकटेशचा झेल सुटल्याने त्याला जीवदान मिळाले होते. याचा चांगला फायदा त्याने घेतला. व्यंकटेशने अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, १० वे षटक काहीसे नाट्यपूर्ण ठरले. रविंद्र जडेजाने टाकलेल्या या षटकात शुबमन गिलला तिसऱ्या चेंडूवर बाद देण्यात आले होते. पण हा चेंडू नोबॉल ठरला. त्यामुळे त्यालाही जीवदान मिळाले. मात्र, पुढच्यात षटकात शार्दुल ठाकूरने कोलकाताला दुहेरी धक्का दिला. या षटकात व्यंकटेश ५० धावांवर माघारी परतला, तर नितीश राणा शुन्यावर बाद झाला.

एवढेच नाही, तर जोश हेजलवूडने १२ व्या षटकात सुनील नारायणचा अडथळा देखील दूर केला. २ धावांवर नारायण रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. दरम्यान, शुबमननेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दिपक चाहरने १४ व्या षटकात त्याला पायचीत करत माघारी धाडले.

त्यामुळे, दिनेश कार्तिक आणि ओएन मॉर्गन ही नवी जोडी मैदानात उतरली. पण रविंद्र जडेजाने कोलकाताला १५ व्या षटकात दुहेरी धक्का दिला. त्याने कार्तिक आणि शाकिब अल हसन यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. कार्तिक ९ धावा करुन, तर शाकिब शुन्यावर बाद केले.

See also  प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमाला आजपासून सुरूवात

त्यानंतर शार्दुलने राहुल त्रिपाठीला २ धावांवर १६ व्या षटकात, तर १७ व्या षटकात ओएन मॉर्गनला ४ धावांवर जोश हेजलवूडने बाद केले. अखेर लॉकी फर्ग्यूसन आणि शिवम मावीने काही आक्रमक फटके खेळले. पण, ते कोलकाताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. मावीला ड्वेन ब्रावोने अखेरच्या षटकात बाद केले. त्याने २० धावा केल्या. कोलकाताला २० षटकात १६५ धावाच करता आल्या.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दीपक चाहर आणि ड्वेन ब्रावोने प्रत्येकी १ विकेट घेतली.

फाफ डू प्लेसिसचे दमदार अर्धशतक

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही चेन्नईचा चांगली सुरुवात मिळवून देताना सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान ऋतुराज गायकवाडने २४ वी धाव घेताच यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्याने केएल राहुलला याबाबतीत मागे टाकले. पण, त्याला ३२ धावांवर ९ व्या षटकात सुनील नारायणने बाद केले आणि त्याची व डू प्लेसिसची ६१ धावांची भागीदारी तोडली.

तो बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी रॉबिन उथप्पा मैदानात उतरला. चेन्नईने पहिल्या १० षटकात १ बाद ८० धावा केल्या.

उथप्पानेही फाफ डू प्लेसिसला भक्कम साथ दिली. या दोघांनी आक्रमक खेळ करत चेन्नईला १२ षटकांत १०० धावांचा टप्पा पार करुन दिला. दरम्यान, फाफने त्याचे वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर त्याने आयपीएल २०२१ मध्ये ६०० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. उथप्पा आणि फाफने दुसऱ्या विकेटसाठी खेळताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मात्र, उथप्पा आक्रमक खेळत असतानाच १४ व्या षटकात ३१ धावांवर नारायणच्याच गोलंदाजीवर पायचीत झाला. तो बाद झाल्यानंतर मोईन अली फलंदाजीसाठी मैदानात आला.

See also  सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा : सिद्धार्थ देसाई खेळणार

त्यानेही सुरुवातीच्या फलंदाजांप्रमाणे डू प्लेसिसला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चेन्नईला १९० धावांचा टप्पा पार करुन दिला. दरम्यान फाफ डू प्लेसिस डावाच्या अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याला शिवम मावीने व्यंकटेश अय्यरच्या करवी झेलबाद केले. डू प्लेसिसने ५९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. तर मोईन अली २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईने २० षटकांत ३ बाद १९२ धावा केल्या.

कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शिवम मावीने १ विकेट घेतली.