सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा : सिद्धार्थ देसाई खेळणार

0

बारामती :

उत्तर प्रदेशमधील अयोध्य येथे 13 ते 16 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीच्या शुभम शिंदे याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्राच्या संघात मुंबई शहरच्या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पंकज मोहिते व सुशांत सैल ही त्यांची नावे. तसेच मुंबई उपनगरचा रिशांक देवाडिगा हादेखील महाराष्ट्राच्या संघात आहे. विकास काळे, ऋतुराज कोरवी व संकेत सावंत यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून देण्यात आली.

प्रो कबड्डीमधील तारांकित कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई गतवर्षी महाराष्ट्र आणि रेल्वे या दोन्ही संघांकडून खेळण्यात अपयशी ठरला होता. यंदा रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे तो महाराष्ट्राकडून खेळू शकणार आहे. याशिवाय रिशांक देवाडिगा, गिरीश इर्नाक, नीलेश साळुंखे या प्रो कबड्डी गाजवणाऱ्या खेळाडूंचाही संघात समावेश आहे.

महाराष्ट्राचा संघ : कर्णधार : शुभम शिंदे, अजिंक्य पवार (रत्नागिरी), पंकज मोहिते, सुशांत साईल (मुंबई शहर), सुनील दुबिले, सिद्धार्थ देसाई (नांदेड), सुधाकर कदम (पुणे), गिरीश इरनाक, निलेश साळुंखे (ठाणे), रिशांक देवडिगा (उपनगर), मयूर कदम (रायगड), दादासाहेब आव्हाड (नंदुरबार); प्रशिक्षक : प्रशांत सुर्वे, व्यवस्थापक : बजरंग परदेशी.

See also  भारतीय महिलांच्या जिगरबाज खेळाने ऐतिहासिक कसोटीत इंग्लंड विजयापासून वंचित