ऋतुराज आणि उथप्पाच्या अर्धशतकानंतर धोनी च्या फटकेबाजी मुळे चेन्नई ९ व्या वेळी फायनल मध्ये

0

दुबई :

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला रविवारी (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. रविवारी पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या गुणतालिकेतील अव्वल दोन संघात झाला.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा करत चेन्नईसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला. चेन्नईककडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने अर्धशतकं केली.

चेन्नईकडून १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस सलामीला उतरले. पण, डू प्लेसिस फार काळ टिकू शकला नाही. त्याला पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्किएने सुरेश चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. डू प्लेसिस १ धावेवर बाद झाला.

यानंतर ऋतुराज आणि रॉबिन उथप्पाने चेन्नईला भक्कम स्थितीत उभे केले. या दोघांनी शानदार फलंदाजी करताना शतकी भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान त्यांनी वैयक्तिक अर्धशतकंही पूर्ण केली. पण ही भागीदारी टॉम करनने उथप्पाला बाद करत तोडली. त्याला अफलातून झेल बाऊंड्री लाईनजवळ श्रेयस अय्यरने घेतला.

त्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही त्याच षटकार करनने अय्यरच्याच करवी झेलबाद केले. तर १५ व्या षटकात अंबाती रायडू १ धावेवर धावबाद झाला. यानंतर ऋतुराजला मोईन अलीने चांगली साथ दिली होती. पण, ऋतुराजला ७० धावांवर बाद करत सामन्यात रोमांच आणला.

पण अखेर, धोनीने आक्रमक खेळ करताना शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारुन चेन्नईसाठी अंतिम सामन्याची दारं खुली केली.

See also  ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी महिला संघाने पहिल्यांदाच मारली उपांत्यपूर्व फेरीत धडक