आयपीएल २०२१ :
युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे.
9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआरने उर्वरीत पर्वाची सुरुवात विजयाने केली आहे. अबूधाबीच्या शेख जायद मैदानात सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत केकेआरने आरसीबीला 92 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि सलामीचा सामना खेळत असलेल्या वेकंटेश अय्यर याने धमाकेदार फलंदाजी करत 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला.
यावेळी शुभमन त्याच्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावांनी हुकला. पण त्याने केलेल्या 48 धावांच्या जोरावर केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले होते. गिलने त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर दुसरीकडे सलामीचा सामना खेळणाऱ्या वेकंटेश अय्यरने नाबात 41 धावांची तुफान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
वरुणची जादू चालली
भारतीय संघात आगामी टी20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या वरुण चक्रवर्तीला मिस्ट्री स्पीनर म्हटले जाते. त्याने त्याच्या या खिताबाला साजेशी गोलंदाजी करत आज आरसीबीच्या फलंदाजाना जेरीस आणलं. 4 षटकांत केवळ 13 धावा देत त्याने 3 विकेट्स घेतल्या. सोबतच कायल जेमिसन याला रनआऊट देखील केलं. वरुणच्या या जादूई गोलंदाजीमुळेच आरसीबीचा संघ 92 धावांवर सर्वबाद झाला. वरुणने ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी आणि वनिंदू हसरंगा यांचा विकेट घेतला. तर जेमिसनला रनआउट केलं.