पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश याच्यासह पाच जणांवर मोक्का लागू

0

पिंपरी चिंचवड :

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड, त्याचा मुलगा गणेश गायकवाड आणि कुटुंबीयांनी सुनेला शारीरिक, मानसिक त्रास दिला. सुनेने पहिली तक्रार दाखल केली आणि त्यापाठोपाठ तक्रारींचा पाऊस पोलिसांपुढे पडला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकापाठोपाठ एक अशा आठ गुन्ह्यांमध्ये आढळलेल्या नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश याच्यासह पाच जणांवर मोक्का लागू केला आहे.

नाना गायकवाड आणि त्याच्या मुलाने विविध लोकांच्या जमिनी बळकावणे, सुनेला त्रास देणे, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनवण्याच्या दृष्टीने अपहरण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे असे विविध गुन्हे केले आहेत.

या बापलेकाविरोधात पिंपरी- चिंचवडमधील सांगवी, हिंजवडी तर पुणे शहरामधील चतुःश्रृंगी, चंदननगर आणि ग्रामीण पोलीस दलातील पौड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत‌.

या सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली आणि ती शिफारस मंजूर करण्यात आल्यामुळे अखेर पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पाच दिवसांपूर्वीच नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा आणि इतर तीन जणांचावर सांगवी पोलिस ठाण्यात महेश पोपट काटे यांच्या कर्जाच्या रकमेसंदर्भातील तक्रार दाखल झाली होती. जमीन आणि घर नावावर करून दे म्हणून त्याला धमकी देण्यात आली होती. त्यावरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यापूर्वीच या बापलेकाविरोधात सुनेला त्रास देणे, इतर लोकांना खंडणी मागणे, अपहरण करणे असे विविध गुन्हे दाखल झाले होते.

See also  परिहार चौक औंध येथे काँग्रेस पक्षाचे शेतकरी विरोधी काळे कायदे व महागाई विरोधात आंदोलन.