पाषाण :
घरात एकट्या असलेल्या 80 वर्षीय महिलेचे हात आणि तोंड कापडाने बांधून घरातून सव्वाचार लाख रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या केअर टेकरच्या पायावर कोयत्याने आणि काठीने मारून त्यालाही जखमी करण्यात आले आहे. ही घटना पुण्यातील पाषाण परिसरात बुधवारी (3 मार्च) सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ४ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
फिर्यादी महिला केअर टेकरसह पाषाण येथील पंचवटी सोसायटीमध्ये राहतात. मात्र, बुधवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास हातात कोयता, सुरा, काठी आदी असलेले 4 अज्ञात व्यक्ती जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. सुरुवातीला त्यांनी केअर टेकरला जखमी केले. त्यानंतर केअर टेकरसह वृद्ध महिलेचे हात आणि तोंड कापड्याने बांधले. तसेच माल कोठे आहे? विचारत घरातील सर्व सामान विस्कटून टाकले. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील बेडरूमच्या कपाटातील दरवाजे उचकटले. त्यामध्ये ठेवलेले २५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लुटून पसार झाले. त्यानंतर वृद्ध महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन ४ अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चतु:श्रृंगी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. ही टोळी सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, बॅग पळविणे यांसारखे गुन्हे करत होती. याप्रकरणी पोलिसांनी राजाभाऊ उर्फ राजुखेमू राठोड (वय, 36), नागेश रामप्पा बंडगर (वय, 34) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच यांच्या टोळीत नेमके किती जण आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत.