स्वर मल्हार संगीत महोत्सवाला सुरुवात, गायन आणि सतार वादनाद्धारे रसिकांनी अनुभवल्या राग मल्हारच्या विविध छटा

0

पुणे :

बाहेर दाटून आलेला पाऊस आणि सभगृहात गायन व सतार वादनामधून बरसणाऱ्या मेघसरी आज पुणेकरांनी अनुभविल्या. निमित्त होते ९ व्या स्वरमल्हार महोत्सवाचे. यानिमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात रसिकांनी राग मल्हारच्या अनेकविध छटांचा आनंद घेतला.

स्वरझंकारचा उपक्रम असलेल्या खास मान्सून मधील स्वरमल्हार संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून जून – जुलै महिन्यांमध्ये 3 दिवस 3 ठिकाणी सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात’ मल्हार के रंग’ या कार्यक्रमाने झाली. यावेळी मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात रश्मी मोघे, सुरंजन खंडाळकर,  श्रृती देशपांडे, शुभम खंडाळकर आणि साई पांचाळ यांचे गायन झाले.तर उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक पूर्बायन चँटर्जी यांच्या सतारवादनाने पुणेकरांच्या मनांच्या तारा छेडल्या.

आज झालेल्या कार्यक्रमास सुप्रसिद्ध तबला वादक पद्यश्री पंडित विजय घाटे, ओर्लीकॉन बालझर्स प्रवीण शिरसे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव, द नेचर-मुकाईवाडीचे सुशीलकुमार देशमुख, वायोलिन अकादमीचे संस्थापक प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

ओलीकॉन बाल्झर्स, सुहाना, विलास जावडेकर डेव्हलपर्स, पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटी, विलो व द नेचर आदी संस्थांचे सहकार्य यावर्षी महोत्सवाला लाभले आहे.’कार्यक्रमाच्या शेवटी या सर्वानी ‘नादान जीयरा गुम गयो रे… .ही देस रागातील रचना सादर करीत समारोप केला. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार आणि संवादिनीवर अमेय बीचू यांनी साथसंगत केली.

त्यानंतर दुस्या सत्रात पुर्बायन चॅंटर्जी यांचे सतारवादन रंगले. सेनिया मेहेर घराण्याचे पाईक असलेल्या पुर्बायन चॅँटर्जी यांची वाद्याची जाण आणि त्यांनी प्रस्तुत केलेले भावपूर्ण वादन यांनी रसिकांची मने जिंकली. राग मल्हार प्रस्तुत करण्याची संधी मिळाली असली तरी गौड मल्हारची फर्माईश असल्याने माझी परीक्षा पुणेकर घेत आहेत असे मिश्कीलपणे सांगत चॅंटर्जी यांनी राग गौड मल्हारची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला यांचे सादरीकरण केले. यानंतर त्यांनी विलंबित झपताल सादर केला.सूरदासी मल्हार रागामध्ये पंडित राधिका मोहन मैत्रा यांची ट्रुत रचना त्यांनी प्रस्तुत केली. चैती धून सादर करीत त्यांनी समारोप केला.

See also  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

पुर्बायन चॅंटज्जी यांना तनय रेगे यांनी समर्थ तबला साथ केली. राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.