“बापटांच्या रूपाने हक्काचा आपला माणूस गमावला” – प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे

0

शिवाजीनगर :

कै. मा. श्री. गिरीश बापट साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार, दिनांक ०३/०४/२०२३ रोजी सायंकाळी ४:०० वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे -५ येथे शोकसभेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

बापट कुटुंबियांच्या वतीने सौ. स्वरदा गौरव बापट ह्या उपस्थित होत्या. या शोकसभेस प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे, उपकार्याध्यक्ष अॅड्. बाबासाहेब चव्हाण, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, प्रा. डॉ. सौ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व पदाधिकारी, संस्था संचालित सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बापट कुटुंबियांचे हितचिंतक, स्नेही हेदेखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कै. गिरीश बापट साहेब हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य तसेच वार्षिक सर्व साधारण सभेचे सन्माननीय सदस्य होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीला वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेला कोणतीही अडचण निर्माण झाल्यावर त्यांनी संस्थेला मदतीचा हात कायम पुढे केला होता याच जाणिवेतून कै. गिरीश बापट यांच्या शोकसभेचे आयोजन संस्थेद्वारे करण्यात आले असल्याचे संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले व संस्था सदैव त्यांच्या ऋणात राहील अशी भावना व्यक्त केली.

संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. डॉ. सौ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी कै. गिरीश बापट साहेबांच्या संबंधीच्या आठवणी सांगताना पुणे महानगरपालिकेतील कार्यपद्धती, नगरसेविका म्हणून कशा पध्दतीने समाजहिताच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम कसे राबवावेत, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून झोकून देऊन समाजाची सेवा कशा पद्धतीने करावी याबाबत पुण्यातील सर्व नगरसेवकांना कै. गिरीश बापट साहेब विविध कार्यक्रमातून, बैठकांमधून मोलाचे मार्गदर्शन करत असत. पक्ष बांधणीच्या दृष्टीने देखील त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना या मोलाच्या ठरत. कै. बापट साहेबांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा उपयोग निश्चित भविष्यात सामाजिक क्षेत्रात काम करतांना होईल, याचा मला विश्वास आहे. त्यांच्या जाण्याने समाजाचे व पुणेकरांचे मोठे नुकसान झाले आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

See also  नव्या कल्पनांमुळे विज्ञानाला विकसित होण्याची संधी मिळते : डॉ. विजय भटकर, श्री. स्वामी समर्थ औंध पुरस्कारा'चे वितरण

संस्थेचे उपाध्यक्ष अॅड्. बाबासाहेब चव्हाण यांनी कै. बापट साहेबांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झालेल्या संस्कारांचा उल्लेख केला. तसेच नदीपलीकडील बापट साहेबांच्या व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शिवाजीनगर भागातील, गावठाण, पोलीस वसाहत, ज्ञानेश्वर पादुका चौक, वाकडेवाडी याठिकाणच्या गणेश मंडळांना व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी कै. गिरीश बापट साहेबांनी मोठे योगदान दिले आहे. ते कदापिही आम्ही विसरू शकत नाही, अशा भावना श्रद्धांजलीपर भाषणात त्यांनी व्यक्त केल्या.

बापट कुटुंबियांच्या वतीने कै. गिरीश बापट साहेबांच्या सूनबाई सौ. स्वरदा गौरव बापट यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी त्यांनी ‘आज बाबा आमच्यात नाही’, याच्यावर विश्वासच बसत नाही. तसेच त्यांची प्रचंड इच्छा शक्ती होती मोठ्या धीराने ते आजाराला सामोरे जात होते. रुग्णालयात अतिदक्षता विभागात असतांना देखील स्वीय सहकाऱ्यांच्या मदतीने जनतेची कामे मार्गी लागावी याबाबत ते आग्रही होते. आमच्या कुटुंबाचा एक आधारवड हरपला आहे. या दुःखातून सावरणे अवघड आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांचे संस्था व प्रा. डॉ. एकबोटे सरांशी इतके मित्रत्वाचे नाते होते याची मला कल्पना होती व आजच्या शोकसभेमुळे मला याबाबत व संस्थेच्या कामकाजाबाबत अधिक माहिती झाली, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना आपल्या जुन्या आठवणींना व बापट साहेबांबरोबरच्या मित्रत्वाच्या नात्याला उजाळा दिला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून टाटा मोटर्स मध्ये रुजू झाल्यानंतर कामगार नेते म्हणून बापट साहेबांचा उदय झाला. कामगार हिताच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी पिंपरी चिंचवड भागातील कंपन्यांमध्ये मोठा लढा दिला. प्रसंगी अडीअडचणी समजावून घेऊन उत्तम मार्ग काढण्याची भूमिका बजावली. पुणे महानगरपालिकेचे सलग तीन वेळा नगरसेवक, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष सलग पाच वेळा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सन्माननीय सदस्य तर भारताच्या 17व्या लोकसभेचे सन्माननीय खासदार हा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. सलग इतक्या वेळा निवडून तेही पुणे शहरासारख्या ठिकाणी ही गोष्ट सोपी नाही. बापट साहेबांचा जनसंपर्क हा खूप दांडगा होता. सर्व प्रकारच्या जाती-धर्माचे लोक हे बापट साहेबांना या ना त्या कारणाने जोडले गेले होते. बापट साहेब त्यांच्या प्रत्येक व्यक्तीशी सौहार्दाने विचारपूस करत घट्ट नाते जोडत गेले. श्रीयुत बापट साहेब यांचे सर्व राजकीय पक्षात मित्रमंडळी होती. ते जरी भाजपाचे आमदार होते तरी ते सर्वपक्षीय आमदार म्हणून त्यांचे पुणे शहरात ओळख होती व प्रतिमा होती. खऱ्या अर्थाने बापट साहेब 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे प्रत्यक्षात राबवितांना आम्ही सर्वांनी जवळून पाहिले आहे. प्रा. डॉ. एकबोटे यांनी श्री. बापट साहेब यांच्या नगरसेवक पदाची पहिली निवडणूक ते लोकसभेची खासदारकीची निवडणूक या सर्व निवडणुकांचा परामर्श त्यांच्या भाषणात केला. त्या दरम्यान झालेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पक्षाचा एक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता पक्षासाठी आणि देशासाठी आपले 50 वर्षाचे आयुष्य समर्पित करतो. झोकून देऊन समाजाची, जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कटीबद्ध राहतो, एवढेच नव्हे ज्यांना कोणत्याही अडीअडचणी आल्या त्यातून दिशा दाखविण्याचे, अपयशातून खचून न जाता उभारी घेण्याचे बळ हे बापट साहेबांच्या एखाद्या फोनवरील संभाषणातून देखील मिळत असे, अशा भावना व्यक्त केल्या. श्री. बापट साहेबांनी संस्थेला वेळोवेळी केलेल्या मदतीचे व योगदानाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. बापट साहेबांच्या जाण्याने माझा स्वतःचा व संस्थेला आपला माणूस, हक्काचा माणूस गमावला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बापट साहेबांच्या जाण्याने पुणे शहराने मोठा नेता व मार्गदर्शक गमावला आहे. ही पोकळी कदापिही भरून निघणार नाही. या प्रसंगी बापट साहेबांच्या कुटुंबाच्या दुःखात मी व्यक्तीशः व संस्था सहभागी असून हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी वाहिली.

See also  पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यानाचे आयोजन...

यावेळी संस्थेच्या उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे व उपस्थित सर्वांनी ‘शांती मंत्र’ म्हटला. तसेच सभागृहातील सर्वांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून कै. बापट साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली.