महिला अंडर-19 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवून रचला इतिहास…

0

दक्षिण आफ्रिका :

आयसीसीने पहिल्यांदा आयोजित केलेल्या महिला अंडर-19 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला. पोचेफस्टूममध्ये रविवारी 29 जानेवारीला फायनलचा सामना झाला. भारताने इंग्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवत पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. भारत महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा विश्वविजेता बनलाय.

15 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. बरोबर 15 वर्षानंतर शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या मुलींनी त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली.

तीनवेळा वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव

मिताली राज आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या सीनियर महिला टीमला तीनवेळा वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवाच दु:ख पचवाव लागलं होतं. 2020 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची निराशा झाली होती. शेफाली वर्मा त्या टीमचा भाग होती. तिचा हा पहिला वर्ल्ड कप होता. त्यावेळी तिने वयाची 16 वर्ष सुद्धा पूर्ण केली नव्हती. त्या पराभवानंतर आता तीन वर्षांनी शेफालीने विश्वविजेतेपद मिळवून हिशोब चुकता केला.

गोलंदाजांची रचला पाया

पोचेफस्टूममध्ये भारताची कॅप्टन शेफाली वर्माने टॉस जिंकला. तिने पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तितास साधुने हा निर्णय योग्य ठरवला. तिने इंग्लंड टीमची पहिली विकेट काढली. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये स्पिनर अर्चना देवीने दुसरा विकेट काढला. तिथून इंग्लंडची रांग लागली. 10 व्या षटकाच्या अखेरपर्यंत इंग्लंडची स्थिती 5 बाद 39 होती. यात तितासने 4 ओव्हरमध्ये 6 रन्स देऊन दोन विकेट काढल्या. अर्चनाने सुद्धा दोन विकेट काढल्या.

सौम्या-तृषाने मिळवून दिला विजय
इंग्लंडने 69 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फार चांगली झाली नाही. कॅप्टन शेफाली वर्मा आणि टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारी श्वेता सेहरावत फक्त 20 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतल्या होत्या. भारताचा डाव इंग्लंडसारखा ढेपाळण्याची भिती सतावत होती.

सौम्या तिवारी (24) आणि जी तृषा (24) यांनी डाव सावरला. दोघींनी 46 धावांची भागीदारी करुन विजय निश्चित केला. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना तृषा बाद झाली. सौम्याने विजय निश्चित केला. 14 व्या शेवटच्या चेंडूवर भारताने एक धाव घेऊन इतिहास रचला.

See also  भारताने एकदिवसीय मालिकेतील श्रीलंका विरुध्द पहिला सामना 67 धावांनी जिंकला..

https://twitter.com/BCCI/status/1619732359783514113?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1619732359783514113%7Ctwgr%5E5cbeb965f6dd39095cee83ddef7453661bad732c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F