भारतीय महिला क्रिकेट संघाची इंग्लंड महिला संघावर मात…

0

इंग्लंड :

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रविवारी (18 सप्टेंबर) दौऱ्यावरील वनडे मालिकेला सुरुवात झाली. होव येथील या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला 222 धावांवर रोखले.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी शानदार अर्धशतके ठोकत संघाला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. 91 धावा करणारी स्मृती सामन्याची मानकरी ठरली.

टी20 मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत भारतीय संघाला विजयाची अपेक्षा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला मोकळ्या हाताने फलंदाजी करू दिली नाही. भारतासाठी सात गोलंदाजांनी गोलंदाजी केली. निर्धारित 50 षटकात इंग्लंड केवळ 7 बाद 227 धावा केल्या. इंग्लंडसाठी डेविसन रिचर्डने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने दोन बळी आपल्या नावे केले.

या धावांचा पाठलाग करताना आक्रमक सलामीवीर शफाली वर्मा केवळ एक धाव करून माघारी परतली. मात्र, त्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया ही जोडी जमली. दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. यास्तिका अर्धशतक करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर ही मैदानावर आली. तिने स्मृतीला सुयोग्य साथ देत भारताला विजयाच्या दिशेने नेले. दोघींमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. शतकाकडे चाललेली स्मृती 91 धावांवर बाद होऊन परतली. त्यानंतर हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस हरलीन देओलसह तिने विजयाची पूर्तता केली. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

See also  पॅरालिम्पिकमध्ये भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली