नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जे काही करतात ते ‘वरुन’च करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नागपूर येथील फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामांच तोंड भरून कौतुक केलं.
फुटाळा लेकवरच्या लेझर शो पाहिल्यानंतर असे आजवर मी भारतात पाहिलेले नाही, असे जे काही पाहिले ते भारताच्या बाहेर पाहिले असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं. “नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. उड्डाणपूल ही वर जातो, कारंजे ही वर जातात. आमचे दोघांचे विचार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो. मी जे काही आज पाहिले ते अद्भुत आहे. हे फक्त नागपूरच्या लोकांसाठी नाही तर देशातील लोकांसाठी पाहण्यासारखी गोष्ट आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी यावेळी केले.
नितीन गडकरी यांनी देखील यावेळी राज ठाकरे यांच कौतुक केलं. राज ठाकरे हे तज्ज्ञ कलाकार आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी फुटाळा लवात आगामी काळात मोठं हॉटेल उभारणार असल्याचं सांगितलं. ” या तलावात 80 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये हॉटेल बनवणार आहे. हे हॉटेल तलावात असेल आणि त्यासाठी बोटीने हॉटेलपर्यंत जाण्याची सुविधा करण्यात येणार आहे. शिवाय तलावाच्या शेजारी जवळपास 1100 वाहनांचे पार्किंग करण्यात येणार आहे. नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असून त्यासाठी कमळाच्या साडेसहाशे जाती गोळा करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलंय.
राज ठाकरे हे कलावंत आहेत. ते उत्तम चित्रकार आहेत. राज ठाकरे आज नागपुरात आले तर मी त्यांना फाऊंटन पाहायला निमंत्रित केले. अजून काम पूर्ण झाले नाही, अजून व्यवस्था वाढवत आहोत. आणखी लोक बसू शकतील अशी व्यसस्था करणार आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.