राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारतीय पैलवानांची सोनेरी कामगिरी मिळवली सहा सुवर्ण पदके..

0

बर्मिंगहॅम :

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारतीय पैलवानांची सोनेरी कामगिरी आजही सुरुच राहिली. भारताचा ऑलिम्पिक रौप्यविजेता पैलवान रवी दहिया, विनेश फोगाट आणि नवीन यांनी आज सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

रवी दहियानं 57 किलो वजनी गटात नायजेरियन पैलवानाचा 10-0 अशा गुणांनी धुव्वा उडवला. रवीचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं. रवीसह पैलवान विनेश फोगाटनंही राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसरं सुवर्णपदक पटकावलं. तिनं महिलांच्या 53 किलो गटात श्रीलंकेच्या पैलवानावर मात करत ऐतिहासिक यशाला गवसणी घातली.

तर 74 किलो गटात पैलवान नवीननं सोनेरी यश मिळवलं. विनेशची ‘सोनेरी’ हॅटट्रिक विनेश फोगाटसाठी राष्ट्रकुल स्पर्धेतलं यंदाचं यश हे खास ठरावं. कारण तिनं राष्ट्कुलमध्ये सोनेरी यशाची हॅटट्रिक साजरी केली आहे. असं करणारी ती भारताची आजवरची पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.

विनेशनं 2014 सालच्या ग्लासगो, 2018 साली गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये मध्ये सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती. यंदा बर्मिंगहॅममध्येही विनेशनं सुवर्ण यशाची परंपरा कायम ठेवली. कुस्तीत पदकांची रास राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये भारतीय पैलवानांचं वर्चस्व दिसून आलं. गेल्या दोन दिवसात भारतीय पैलवानांनी 10 पदकं भारताच्या खात्यात जमा केली आहेत. त्यात 6 सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. काल 65 किलो गटात बजरंग पुनिया, 86 किलो गटात दीपक पुनिया आणि महिलांच्या 62 किलो गटात साक्षी मलिकनं सुवर्णपदक जिंकलं होतं. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये पदक विजेते पैलवान – बजरंग पुनिया – सुवर्ण (65 किलो) साक्षी मलिक – सुवर्ण (62 किलो) दीपक पुनिया – सुवर्ण (86 किलो) रवी दहिया – सुवर्ण (57 किलो) विनेश फोगाट – सुवर्ण (53 किलो) नवीन – सुवर्ण (74 किलो) अंशू मलिक – रौप्य (57 किलो) दिव्या काकरन- कांस्य (68 किलो) मोहित ग्रेवाल – कांस्य (125 किलो) पूजा गेहलोत – कांस्य (50 किलो)

See also  कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघासाठी निवड