कसून सराव करा, पौष्टिक आहार आणि भरपूर विश्रांती, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने दिला सल्ला..

0

पुणे :

कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनंद घ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करा, कसून सराव करा, पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर विश्रांती घ्या, असा सल्ला भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने उपस्थितांना दिला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात उपस्थितांना संबोधित करताना सुनील छेत्री (Sunil Chhetri) बोलत होता. यावेळी विविध वयोगटातील खेळाडू आणि क्रीडा प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी छेत्रीला पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे,क्लबचे मानद सचिव सारंग लागु यांच्या हस्ते क्लबचे सन्मानीय सदस्यत्व देण्यात आले.

यावेळी युवकांना सल्ला देताना सुनील छेत्री म्हणाला की, तुम्हाला कोणत्याही लक्षाचा पाठलाग करताना स्वतःशीच स्पर्धा करावी लागेल आणि प्रत्येक दिवशी कालच्यापेक्षा सरस कामगिरी करावी लागेल. मला जेव्हा सर्वोत्तम कामगिरी करता येत नाही, तेव्हा त्याचा खूप त्रास होतो. सामना जिंकणे किंवा हारणे यापेक्षाही सर्वोत्तम कामगिरी करणे, हाच निकष असावा लागतो.

भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासह इंडियन सुपर लीगमधील बेंगळुरू संघाचे नेतृत्व करणारा छेत्री फॉरवर्ड(आक्रमक)या जागेवर खेळतो. भारताच्या सर्वकालिक सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असा लौकिक मिळवणारा छेत्री सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये क्रि स्तीयानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांच्या पाठोपाठ सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतामध्ये गुणवतेची कमतरता नसून योग्य वेळात गुणवान खेळाडू शोधणे तसेच त्यांना योग्यवेळी सर्व सुविधा, साधने व प्रशिक्षण देणे शक्य झाल्यास आपल्यालाही जगज्जेते तयार करता येतील असे सांगून छेत्री म्हणाला की, अनेक खेळांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. अर्थात एकूण क्रीडा क्षेत्राचा विचार करता भारताला अद्याप बरीच मजल मारायाची आहे.

स्त्री आणि पुरुषांच्या क्रीडा प्रकारात भेदभाव केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून छेत्री म्हणाला की, मुले आणि मुली या दोघांनाही सारख्याच संधी व सुविधा दिल्या गेल्या आहेत. किंबहुना, मुली या मुलांपेक्षा सरस असल्याचा माझा विश्वास आहे. त्यामुळे मुलींनी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्रात भाग घेतल्यास त्यातून त्याप्रमाणात चांगली फळेही मिळतील.

See also  गुजरात टायटन्स पदार्पणातच पटकावलं आयपीएल 2022 चे विजेतेपद

आपल्या बालपणीची आठवणी सांगताना छेत्री म्हणाला की, माझे वडील सेनादलात होते व त्यांची सतत बदली होत असे. मात्र, माझ्या आईने मला सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले. माझी आई हीच माझी सर्वात मोठी स्पर्धक आणि प्रेरणाही होती.मला प्रामाणिकपणे काय करायचे वाटते हे तिने विचारले आणि ते करण्याची पुरेपूर संधी तिने दिली.

अन्वर अली व महेश गौरी हे भारतातील सर्वोत्तम बचावपटू असल्याचे सांगताना आपल्या निवृत्तीबद्दल काही भाकीत करण्यास त्याने नकार दिला. सर्वोत्तम कामगिरी करत राहण्यावर माझा विश्वास आहे मी खेळाचा पुरेपूर आनंद घेत आहेत आणि संघालाही माझा उपयोग आहे अशी खात्री असेपर्यंत मी खेळत राहील असे सांगून छेत्री म्हणाला की, मी आता गेली 21 वर्षे खेळातच आहे आणि यापूढेही खेळत राहीन. बेंगळुरू फुटबॉल क्लब हे माझे कुटुंबच असून या संघातच राहण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.