भारताचा दक्षिणअफ्रिकेवर टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ४८ धावांनी विजय..

0

विशाखापट्टनम :

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील तिसरा आणि महत्त्वपूर्ण सामना मंगळवारी (१४ जून) खेळला गेला. विशाखापट्टनमच्या विजाग स्टेडियमवर हा सामना रंगला.

यजमान भारतीय संघ ५ सामन्यांच्या या मालिकेत ०-२ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. या सामन्यांत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन करत सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यांत नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम गोलंदाज करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताकडून फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. भारताने आपली पहिली विकेट १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गमावली. त्यावेळी भारताने ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र, भारताला धावांची गती नियमित ठेवण्यात अपयश आले.हार्दिक पंड्याने डावाच्या शेवटी २१ चेंडूत ३१ धावा करत भारताला १७९ धावांपर्यंत पोहचवले.

भारताने बनवलेल्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना आपली पहिली विकेट २३ धावांवर गमावली. त्यानंतर सातत्याने विकेट्स घेण्यास भारतीय गोलंदाजांना यश आले. विशेषत: भारताकडून गेल्या दोन सामन्यांत निराशाजनक गोलंदाजी करणाऱ्या युझवेंद्र चहलने या सामन्यांत धमाकेदार गोलंदाजी करत ४ षटकांत २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या धानाकेलदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला सामन्यांत प्रभुत्व मिळवण्यास यश आले. शिवाय भारतासाठी गोलंदाज हर्षल पटेलने चांगली कामगिरी करत आपल्या ३.१ षटकांत २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. जी या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

दरम्यान, या मालिकेतील चौथा टी२० सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे शुक्रवार दिनांक १७ जून रोडी खेळवला जाणार आहे. हा सामना देखील भारतासाठी करो या मरेचा सामना असेल. चौथ्या सामन्यांत भारताला विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याची संधी उपलब्ध असेल.

See also  श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत भारताने जिंकली कसोटी मालिका