बंगळुरू :
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडला. हा दिवस-रात्र कसोटी सामना होता.
या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही आपल्या नावावर केली. भारताच्या विजयाचा शिल्पकार श्रेयस अय्यर ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकावीर म्हणून रिषभ पंतचा सन्मान करण्यात आला.
दुसऱ्या डावात श्रीलंका संघ ४४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. यावेळी श्रीलंका संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार दिमुथ करुणारत्नेने एकाकी झुंज देत १७४ धावांचा सामना करत १०७ धावांची शतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १५ चौकारांचा पाऊसही पाडला होता. मात्र, कर्णधाराव्यतिरिक्त कुशल मेंडिसने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. मात्र, या दोघांव्यतिरिक्त एकाही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही आणि श्रीलंका संघाने १० विकेट्स गमावत २०८ धावांवरच नांगी टाकली. यावेळी भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह ३, अक्षर पटेल २ आणि रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी भारताने दुसरा डाव ९ विकेट्सच्या नुकसानीवर ३०३ धावांवर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या १४३ धावांच्या आघाडीसह श्रीलंकेसमोर ४४७ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. त्याचबरोबर यष्टीरक्षक रिषभ पंतने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माने ४६ धावा कुटल्या होत्या. इतर फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना प्रवीण जयविक्रमाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. लसिथ एम्बुलडेनियाने ३, तर विश्वा फर्नांडो आणि धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.