कौशल्याधारित ज्ञान जन्म भाषेतूनच हवे!- डॉ.काळकर डॉ.आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्‍घाटन संपन्न

0

औंध :

‘‘भारत हा तरुणांचा देश आहे. हे तरुण निवडलेल्या विद्याशाखेतून पदवी संपादित करतात. पदवी बरोबर संपादित केलेल्या ज्ञानाचे उपयोजन प्रत्यक्ष जगण्यात कसे करावे, याचे कौशल्य मात्र या युवकांकडे नसते. या युवकांना जर त्यांच्या जन्मभाषेतून कौशल्याधारित शिक्षण दिले, तर त्याचे उपयोजन करून ते सर्वांगीण प्रगती करू शकतात, जे फक्त शिक्षकच देऊ शकतात. हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर यांनी केले.
ते रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, श्रीरामपूर येथील चंद्ररुप डाकले वाणिज्य महाविद्यालय व कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ‘प्राध्यापक प्रबोधिनीच्या’ उद्‍घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ‘‘नवीन शैक्षणिक धोरण-२०२०’’ या विषयावर बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.रमेश रणदिवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.बंडोपंत कांबळे, प्राध्यापक प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा.अनंत सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.संजय नगरकर यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले, तर चंद्ररूप डाकले वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.सुहास निंबाळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून स्वागत केले.
ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या या व्याख्यानास तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. प्रा.कु.सायली गोसावी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शेवटी अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीच्या प्रमुख डॉ.सविता पाटील यांनी यथोचित आभार व्यक्त केले.

See also  मॉर्डन महाविद्यालय गणेशखिंड येथे MAGN-IT हा कार्यक्रम संपन्न.