टी ट्वेण्टी वर्ल्ड कप नंतर विराट कोहली टी ट्वेण्टी क्रिकेट चे कर्णधार पद सोडणार

0

मुंबई :

टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टी च्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे.

विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

सपोर्ट केलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहली कर्णधारपद सोडताना म्हणाला.

स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे

‘वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसंच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही बॅटसमन म्हणून देत राहील,’ असंही कोहलीने म्हटलं आहे.

भारतीय टीमची सेवा करत राहीन

‘अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित सुद्धा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी 20 विश्वचषकानंतर टी 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली,’ असे कोहलीने स्पष्ट केले. तसेच यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन, असे कोहलीने सांगितले.

See also  वर्ल्ड ऍथलेटिक्सचा 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार मिळवून लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने पुन्हा एकदा उंचविले देशाचे नाव

कोहलीचं करिअर

विराट कोहलीने भारताकडून 65 कसोटी, 95 वन डे आणि 45 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 38 कसोटींमध्ये विजय मिळवला, 65 वन डे जिंकले, तर 29 टी 20 सामने आपल्या नावे केले.

रोहित शर्माकडे टी 20 चं कर्णधारपद?

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.