नॅनो युरिया लिक्वीड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न

0

गांधीनगर :

युरियाच्या एका पोत्याची क्षमता आता बाटलीतील द्रवरूप युरियात परावर्तित करण्यात आली आहे. यामुळे आपल्या वाहतूक खर्चात मोठी बचत झाली असून छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दिनांक २८ मे) व्यक्त केला आहे.

काटोल येथे (गांधीनगर) इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडतर्फे (IFFCO) उभारण्यात आलेल्या नॅनो फर्टिलायझर (Nano Urea Liquid) निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. १७५ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काटोल येथील प्रकल्पात दिवसाकाठी दीड लाख बाटल्या नॅनो युरियाची निर्मिती केली जाणार आहे. येत्या काळात देशभरात असे आणखी ८ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

भारत हा खतांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा खत उत्पादक देश आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नव्हता आणि त्याचा काळ बाजार होत होता. नव्या तंत्रज्ञान अभावी देशातील युरिया निर्मिती प्रकल्प बंद पडले होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणातील येथील बंद पडलेले ५ कारखाने सरकारने पुन्हा सुरु केले. यातील तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील कारखान्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. उर्वरित ३ कारखान्यांतील उत्पादन लवकरच सुरु होईल, असेही मोदी यांनी नमूद केले आहे.

नॅनो युरिया लिक्विड हा कृषी संशोधनातील एक नवा आविष्कार आहे. पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय या नॅनो युरियाचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण टाळून उत्पादनवाढीला चालना देणारे नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत खत आहे. इफ्कोने इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्चच्या (ICAR) मदतीने नॅनो युरियाची देशभरातील १५ हजार ठिकाणी प्रात्यक्षिके घेतली आहेत. त्यानंतरच या नॅनो युरियाला केंद्रीय खते, रसायने मंत्रालयाकडून अंतिम संमती मिळालेली आली आहे.

See also  नियमांचे पालन करणे सोडून दिल्याने वाढला कोरोना : डॉ. रणदीप गुलेरिया

तत्पूर्वी राजकोट येथील एका रुग्णालयाच्या उद्घाटनांनतर मोदी यांनी गुजरातीमध्ये स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. राजकोट जिल्ह्यात अटकोट येथे भाजपच्या लेवा पाटीदार समाजाच्या नेत्याकडून २०० खाटांचे एक सुपरस्पेशॅलिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा दाखला दिला.