केंद्र सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, घरगुती गॅस सह पेट्रोल डिझेल स्वस्त होणार……

0

नवी दिल्ली :

देशभरात गॅसदरवाढीची झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केलीय. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशीही घोषणा सीतारामन यांनी आज शनिवारी केली.

इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. रशिया-युक्रेन युध्दा दरम्यान वाढलेल्या महागाईमुळे केंद्र सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावर आता हा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर २०० रुपयांची (१२ सिलिंडर) सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी केली असून तब्बल ९ कोटींहून अधिक लोकांना या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईनं होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

See also  100 मीटरपेक्षा जास्त लांब रांग असल्यास ती कमी होई पर्यंत टोल घेतला जाणार नाही : एनएचएआय