पुणे :
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘सावित्रीज्योती’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे सुषमा व प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची, तर पहिल्याच राष्ट्रीय ‘रमाई-भीमराव’ पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिका डॉ. माधवी आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनकर खरात यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या सहभागाने महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १५ एप्रिल २०२२ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते या दोन्ही पुरस्कारांचे वितरण होणार आहे. बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची उपस्थिती राहणार आहे.
सुषमा आणि डॉ. संजय चोरडिया यांनी अतिशय परिश्रमपूर्वक गेल्या २५ वर्षांपासून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. माधवी खरात यांचे साहित्यातील योगदान मोलाचे आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनकर खरात यांनी भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेत उपसंचालक म्हणून ३५ वर्षे सेवा केली आहे. सध्या ते एमआयटी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, संशोधन प्रकल्पासाठी अमेरिकेत आहेत. विविध देशांतील परिषदांमध्ये संशोधन प्रबंध सादर केले आहेत.
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ आणि ‘त्यागमूर्ती रमाई आंबेडकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ संगीता झिंजुर्के (पुणे), प्रीती जगझाप (चंद्रपूर), नलिनी पाचरणे (पुणे), मीनाक्षी गोरंटीवार (यवतमाळ), विद्या जाधव (अहमदनगर), उमा लूकडे (बीड), माधुरी वानखेडे (अमरावती) यांना, तर ‘त्यागमुर्ती रमाई आंबेडकर पुरस्कार’ निर्मला आथरे (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), दुशीला मेश्राम (नागपूर), मदिना शिकलगार (पलूस), अक्काताई पवार (कडेगाव), सुरेखा गायकवाड (ठाणे), उर्मिला रंधवे (आळंदी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख प्रा. अनंत सोनवणे व मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे यांनी पुढाकार घेतला आहे.