निवडणूक आयोगाने दिली पूर्ण क्षमतेने राजकीय रॅली आणि रोड शो घेण्यास परवानगी

0

नवी दिल्ली :

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षणीय प्रमाणात घटला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच राज्य सरकारांना अतिरिक्त निर्बंध शिथील करण्याच्या सूचना केल्या आहेत.

याचदरम्यान आता निवडणूक आयोगाने ही कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट विचारात घेऊन निर्बंध शिथील केले आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने पूर्ण क्षमतेने राजकीय रॅली आणि रोड शो घेण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर करीत देशातील सर्व राजकीय पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर कोरोना संसर्गात झालेली घसरण राजकीय पक्षांना फलदायी ठरण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने हे निर्बंध शिथील केले

कोरोनाची घटती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोरोनाचे निवडणूक कार्यक्रमांसंबंधी निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार यापुढे रॅली आणि जाहीर सभांमध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्याची परवानगी दिली जात होती. आता 50 टक्के क्षमतेचे निर्बंध रद्द करीत पूर्ण क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच आता मैदानात पूर्ण क्षमतेने रॅली आणि जाहीर सभा घेता येणार आहेत. याशिवाय रोड शो करण्यासही परवानगी मिळाली आहे.

निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा दिलासा

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान जानेवारीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. सध्या पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान झाले आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 172 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले आहे. बुधवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होत आहे.

See also  २०२७ पूर्वी च भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश होणार : चिनी तज्ज्ञ