औरंगाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

0

औरंगाबाद :

राज्यात सगळीकडे सध्या शिवजयंतीचा उत्साह आहे. सगळीकडील वातावरण भगवं झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

त्यामुळे शिवभक्तांचा आनंद द्विगुणीत होतो. आज औरंगाबादेतही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सुरूवातीला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलंय. पालकमंत्री सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांची उपस्थिती यावेळी औरंगाबादेत पहायला मिळाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, बाळासाहेब थोरात, असे अनेक नेते पुतळ्याच्या अनावरणाला उपस्थित होते. औरंगाबादेतला हा पुतळा अत्यंत भव्य असा आहे. या पुतळ्याला यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या पुतळ्यामुळे औरंगाबादच्या वैभवात आणखी वाढ झाली आहे.

कसा आहे पुतळा?

औरंगाबाद शहरातील महत्वाचं ठिकाण असलेल्या क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमी करत होते. त्यानंतर मागील दोन वर्षापासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे सोबतच पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते.साडे तीन कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या शिवाजी महाराजांचा हा पुतळा 25 फूट उंच असून त्याची लांबी 21 फूट एवढी आहे. तर पुतळ्याचे वजन सुमारे 8 टन आहे. तसेच पुतळ्या भोवतीचा चौथरा 31 फुटांचा आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्यासाठी 1 कोटी तर चौथऱ्यासाठी 2.50 कोटी खर्च करण्यात आले आहे.या चौथऱ्याभोवती विविध शिल्प, म्युरल्स, कारंजे सुद्धा तयार करण्यात आले आहेत.

छत्रपती अनेकांचे प्रेरणास्थान

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रचं प्रेरणास्थान आहे. त्यांचा गौरवशाली इतिहास आजही सर्वांच्या तोडपाठ आहे. त्यामुळे शिवजंयतीला मोठ्या प्रमाणात मावळे जमत असतात. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने शिवजंयती मोकळेपणाने साजरी करता येणार आहे. अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरं झळाळली आहेत. सर्वंत शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विर्जन पडलं होतं. मात्र यावेळी कोरोना कमी झाल्याने निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

See also  तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका, तसेच मराठी टक्का कमी करू नका : शरद पवार

अजित पवार यांच्याकडूनही वंदन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचे स्वराज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचे श्रेय सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहिली आहे, यापुढेही तशीच राहील,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.